ativrushti nuksan bharpai district list: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या पावसामुळे आतापर्यंत ३६ लाख ११ हजार ८७२.५ एकर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
कोणत्या पिकांचे सर्वाधिक नुकसान?
राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः १५ ते २० ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांची हानी झाली. यात सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
राज्यात एकूण १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर (३६ लाख ११ हजार ८७२.५ एकर) क्षेत्र बाधित झाले आहे.
नुकसानग्रस्त जिल्हे
ज्या जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे, त्यांची यादी:
नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला, सोलापूर, बुलडाणा, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड आणि नागपूर.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागांमध्ये पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.